इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकमध्ये मंगळुरु येथे एका कारने फुटपाथवर चालणा-या पाच तरुणीला जोरदार धडक दिली. त्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सिटीझन मूव्हमेंट ईस्ट बेंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हे फुटेज पाहून ही घटना एकदम धक्कादायक वाटते. फुटपाथवरुन कार बेदरकारपणे कशी चालवू शकतो असा प्रश्न पडतो..
हे फुटेज शेअर करतांना सिटीझन मूव्हमेंट म्हटले आहे ..फूटपाथही सुरक्षित नाही! कृपया काळजीपूर्वक वाहन चालवा आणि वेग मर्यादा ओलांडू नका. कधीही न येण्यापेक्षा उशीरा पोहोचणे चांगले. मंगळुरूमध्ये भरधाव कारने चार जणांना धडक दिल्याने एका २३ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला.
मंगळुरुच्या लेडी हिल येथे फूटपाथवर पाच तरुणी चालत होत्या. त्याचवेळेस मागून भरधाव कार आली. या कारने इतक्या जोरात धडक दिली की सर्व जण उडाले. त्यात २३ वर्षीय रूपश्रीचा जागीच मृत्यू झाला. तर स्वाती (२६), हितानवी (१६), कार्तिका (१६) आणि याथिका (१२ ) या मुली जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी पांडेश्वर पोलिस ठाण्यात कमलेश बलदेव या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यातही घेण्यात आले आहे. पण, या थरारक अपघाताने मात्र एकुण बेदरकारपणे कार चालवणा-याला चांगलीच अद्दल घडवणे गरजेचे आहे.