इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः कोण काय करेल सांगत येत नाही. एकाने तर एका खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भगवान हनुमानाला प्रतिवादी बनवले. पण, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे देवाचा वापर करणा-याला मोठा झटका बसला..
याचिकाकर्त्याने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण उत्तम नगर येथील जैन कॉलनीतील भाग एकमधील मालमत्तेशी संबंधित आहे. याचिकेत म्हटले आहे, की मालमत्तेवर सार्वजनिक हनुमान मंदिर आहे आणि त्यामुळे ही जमीन भगवान हनुमानाची आहे. भगवान हनुमानाचा जवळचा मित्र आणि उपासक म्हणून याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने म्हटले आहे, की या प्रकरणात याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदवला, की ही जमीन भगवान हनुमानाची आहे आणि भगवान हनुमानाचे पूजक आणि त्यांचे जवळचे मित्र असल्याने त्यांना त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी सुनावणीदरम्यान सांगितले, की माझ्यासमोर असे प्रकरण प्रथमच आले आहे. एक दिवस भगवान हनुमान माझ्यासमोर उभे राहतील असे मला कधीच वाटले नव्हते.