नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथे रात्री तरुणांवर कोयत्याने वार करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. देवळालीगावातील वालदेवी नदीकिनारी असणाऱ्या रोकडोबावाडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अरमान शेख नामक युवक रस्त्यावरून चाललेला असताना नाशिक रोड येथील कोयताधारी हल्लेखोरांनी शेखच्या मागून येत सपासप वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्यास तातडीने बिटको रुग्णालयात नेले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर उपनगर पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. उपनगर पोलिसांत प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.