नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म समाज व राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांना 31 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता गोदा घाट( भाजी बाजार पटांगण) येथे शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे,अशी माहिती, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी,स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोया व स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18वे पीठाचार्य आचार्य जितेंद्र महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या प्रमुख उपस्थितीने या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढणार आहे. गोविंददेव गिरीजी महाराज 30 मे रोजीच नाशकात येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम तसेच गंगा गोदावरी देवीची महाआरती सुद्धा होणार आहे.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र आणि विशिष्ट रकमेची थैली असे पुरस्काराचे स्वरूप आहे,असे गायधनी पुढे म्हणाले.
प.पू.गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे विश्वस्त आहेत.श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देश विदेशात प्रसार करण्याचे व्रत घेऊन त्यांनी घरोघरी श्री भगवद्गीता पोहोचविली आहे. हिंदू बांधवांसाठी वेदांतील ज्ञानसागर खुला व्हावा यासाठी देशभरात वेद पाठशाळा सुरू करून तसेच सनातन धर्माच्या चौकटीत राहून त्यांनी जनमानसाला वेददीक्षा दिली आहे. त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यावेळी त्यांचा नाशिककरांतर्फे जाहीर नागरी सत्कारही करण्यात येणार आहे,असेही गायधनी यांनी नमूद केले. नाशकात मुलींसाठी पहिली संस्कार पाठशाळा सुरू करण्याचे श्रेयही त्यांना जाते.त्यानंतर आळंदी येथे ही शाळा सुरू झाली, याची आठवण धनंजय बेळे यांनी करून दिली.
रामतीर्थ गोदावरी समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही यावेळेस प्रकर्षाने नमूद करण्यात आले, गोदावरी स्वच्छता अभियाना सहित विविध उपक्रम राबवून रामतीर्थ गोदावरी समितीने आपला आगळावेगळा ठसा नाशिकमध्ये निर्माण केलेला आहे व ही आरती फक्त नाशिक महाराष्ट्र पुरतीच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रचलित झाली असल्याचेही यावेळेस नमूद करण्यात आले.
गोदावरी तीरी होत असलेला हा गोदेच्या कुशीतील गोदावरी मातेच्या नावाने दिल्या जाणारा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार हा नाशिकरांसाठी अभिमानाची बाब राहील अशा पद्धतीचे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्यामुळे हा सोहळा अतिशय अविस्मरणीय होईल असे श्री बेळे यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेस गुणवंत मणियार,विजय भातांबरेकर, रामेश्वर मालाणी,नरेंद्र कुलकर्णी,आशिमा केला, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्रनाना फड,कल्पना लोया,कविता देवी,वैभव जोशी, विजय जोशी, प्रभुणे महाराज आदी समिती सदस्य उपस्थित होते.