नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात जिल्ह्यात 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. याच अनुषंगाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अशा आहेत मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधा….
उन्हापासून संरक्षणासाठी मंडप :* मतदानाच्या दिवशी मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये, यासाठी जेथे आवश्यकता आहे, तेथे मंडप उभारण्यात येत आहे.
प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था :* मतदान केंद्रावर, एकाच वेळी मतदारांना रांगेत उभे रहावे लागणार नाही, यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर जास्त गर्दी झाल्यास ५ पेक्षा जास्त पोलिंग बुथ एकाच ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांना जवळच्या प्रतिक्षा कक्षात बसण्यासाठी टेबल व खुर्चीची व्यवस्था केलेली आहे.
पिण्याचे शुध्द पाणी आणि Electrolytes :* मतदार तसेच निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच उष्ण लहरींमुळे होणाऱ्या परिणामांपासुन वाचविण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर Electrolytes उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
दिव्यांग मतदारांसाठी Ramp & Wheel chair ची सुविधा :* ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत, त्या केंद्रांवर Wheel chair ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रावरती Ramp ची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अंध मतदारांसाठी मतदान करतांना बॅलेट युनिटवरच असलेल्या ब्रेल लिपीच्या आधारे, मतदान करता येणार आहे.
स्वच्छतागृहांची व्यवस्था : मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी आलेल्या, सर्व नागरिकांना स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे असणार आहेत.