इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट अजित पवार यांनी काटेवाडी येथील घरी गेल्या. या वेळी त्यांनी आपण काकू म्हणजे अजित पवारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीची दिवसभर आज चर्चा होती.
काटेवाडी येथे खा. सुळे व त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केल्यानंतर त्या अचानक अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी गेल्या. तिथे त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे निवडणुकीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली.
या भेटीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, मी आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. घरात आम्ही दोघीच होतो. मी त्यांची भेट घेऊन बाहेर पडले, असे त्या म्हणाल्या. तुम्ही अजित पवार यांच्या घरी अचानक आला? या प्रश्नावर हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझे बालपण इथेच गेले. मी येथे दोन-दोन महिने राहिले आहे. त्या वेळी माझे आईशीही बोलणे होत नव्हते. माझ्या आईने माझे जेवढे केले, तेवढेच माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असेही त्यांनी सांगितले.