नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नातेवाईक असलेल्या अहमदनगर येथील बापलेकाने एका कुटूंबियास पाच लाखाला गंडा घातला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय बाबुराव काकडे व सॅम्युएल विजय काकडे (रा.सेंट मोनिका डीएड कॉलेजमागे,सावेडी अ.नगर) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत ललिता मथियस एक्का (रा.आयोध्यानगरी,अमृतधाम) यांनी फिर्याद दिली आहे. एक्का यांचा मुलगा रोहित याचा २०१९ मध्ये विवाह ठरला होता. यावेळी वधू पक्षाकडील मंडळी घर पाहण्यासाठी आले होते. त्यात दोघा संशयित बापलेकाचाही समावेश होता. ५ डिसेंबर रोजी झालेल्या या सोहळयात काकडे याने आपल्या सरकारी अधिका-यांशी मोठ्या ओळखी असल्याची बतावणी करीत मुलगा रोहित यास विज कंपनी अथवा पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. वधू पक्षाकडून आलेल्या नातेवाईकांकडून थेट नोकरी लावून देण्याची हमी मिळाल्याने एक्का कुटुंबियांनीही आपल्या मुलासाठी पैसे भरण्याची तयारी दर्शविली.
यावेळी तीन लाख रूपयांची रोकड काकडे बापलेकाच्या स्वाधिन केली. त्यानंतर एक्का यांच्या पतीच्या बँकखात्यातून दोन लाख रूपये ऑनलाईन संशयितांनी स्विकारले. मात्र अद्याप नोकरी लागली नाही चार वर्ष उलटूनही नोकरी लागली नसल्याने एक्का कुटुंबियांनी पैश्यांची मागणी केली असता संशयितांनी टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.