इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क-
फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामी वीरांची शतके आणि गोलंदाजीत ॲडम झांपाने (४ बळी) केलेली उत्कृष्ट गोलंदाजी या कामगिरीच्या आधारावर आज ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. खरे तर इतक्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने बराच काळ चांगली झुंज दिली. एक वेळ तर अशी ही आली होती की, या सामन्यात पाकिस्तानचेच पारडे जड असल्याचे दिसून येत होते. परंतु, पाकिस्तानच्या बॅटर्सकडे नसलेली ‘सब्र’ आणि ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी पकडून ठेवलेली ‘उम्मीद’, यामुळे या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियाचाच विजय नक्की ठरला.
टॉस जिंकून आपण स्वतः फलंदाजी का घेतली नाही? असा पश्चाताप पाकिस्तानला होईपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बॅटर्सनी आज पहिल्या डावात धावांची तटबंदी उभारली. या संघाने ५० षटकात ९ बाद ३६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन सलामीच्या जोडीने आज पाकिस्तानच्या ‘तथाकथित’ वेगवान आणि फिरकी बोलर्सचा पूर्णपणे फडशा पाडला. ऑस्ट्रेलियाची पहिली आणि दुसरी विकेट २५९ या धावसंख्येवर पडली यातच सगळे काही आले. गेल्या काही सामन्यात अपयशी ठरत आलेल्या डेव्हिड वॉर्नरने आज बेंगळुरूच्या मैदानावर फलंदाजी नव्हे तर आतषबाजी केली. १२४ चेंडूत १६३ धावा करून तो बाद झाला. ९ षटकार आणि १४ चौकार यांच्या मदतीने वॉर्नरने या धावा केल्या. दुसरीकडून मिशेल मार्च याने देखील बाद न होण्याचा चंग बांधला होता १०८ चेंडूत १२१ धावा करणाऱ्या मिशेल मार्शने देखील ९ षटकार आणि १० चौकार मारून पाकची गोलंदाजी फोडून काढली. शाहीन अफरिदीने १० षटकात ५ बळी घेतले. परंतु तोपर्यंत ऑस्ट्रेलियन बॅटर्सनी आपले काम पूर्ण केलेले दिसून येत होते.
या मोठ्या धावसंख्येला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या बॅटर्सनी देखील संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती. इमाम-उल-हक आणि आणि अब्दुल्ला शफिक या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर द्यायला सुरुवात केली होती. परंतु, अजिबात फॅार्मात नसलेला पाकचा कर्णधार बाबर अवघ्या १८ धावांवर आणि मैदानावर पाय रोवण्याची क्षमता असलेला सऊद शकील ३० धावांवर लवकर बाद झाल्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा रन रेट चांगलाच थंडावला होता. त्यानंतर पाकिस्तानचा तडाखेबंद फलंदाज इफ्तिकार अहमद अँडम झाम्पाच्या मिडल स्टम्प वरील एका चेंडूवर पायचित झाला. मोहम्मद रिजवान हा पाकिस्तानची शेवटची ‘आशा’ असलेला फलंदाज मैदानात असेपर्यंत विजयाबद्दलचे भाकीत कुणालाही करता येत नव्हते. परंतु तो देखील एडम झांपाचीच शिकार ठरल्यानंतर या सामन्यात पुढे मग पाकिस्तानच्या होत्या नव्हत्या त्या अपेक्षा देखील संपून गेल्या.
उद्या विश्वचषक स्पर्धेत दोन सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यातील सामना लखनऊमध्ये दिवसाच्या लख्ख सूर्यप्रकाशात खेळवला जाईल तर दुसरा सामना हा डे-नाईट पद्धतीने इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होईल.
परवा म्हणजे रविवारी चिवट झुंज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारताची लढत धरमशाला येथे खेळली जाईल. जखमी झाल्यामुळे हार्दिक पांड्या उपलब्ध नाही ही भारतासाठी चिंतेची बाब नक्कीच असणार आहे. भारतीय संघाकडे पुरेसे पर्यायी खेळाडू असले तरी त्यापैकी कुणाला अंतिम ११ मध्ये स्थान द्यायचे हा एक मोठा प्रश्न भारतासाठी डोकेदुखी ठरू शकेल.