नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बसमध्ये चढतांना ठाणे येथील प्रवाशाच्या गळयातील सोन्याचे लॉकेट चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना महानगर बसस्थानकात घडली. या घटनेत सुमारे ४५ हजाराच्या लॉकेटवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललेश विठोबा चुरी (४२ रा.किसननगर,वागळे इस्टेट ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ललेश चुरी शनिवारी (दि.४) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास ते कसारा जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. कसारा बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ४५ हजाराचे सोन्याचे लॉकेट हातोहात लांबविली. अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत.
धारदार चाकू बाळगणारा तरूण पोलीसांच्या ताब्यात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पेलीकन पार्क भागात धारदार चाकू बाळगणारा तरूण पोलीसांच्या हाती लागला. संशयिताच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल चंद्रभान गवळी (१९ रा.मनपा शाळे मागे, हनुमान चौक सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चाकूधारीचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई अनिल गाढवे यांनी फिर्याद दिली आहे. पेलीकन पार्क परिसरातील शिंपी समाज मंगलकार्यालय भागात उभ्या असलेल्या तरूणाकडे चाकू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.४) रात्री पथकाने धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चाकू मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.