इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय २३ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (एमसीए इन्विटेशन लीग), एक दिवसीय सामन्यात, नाशिकने अतिशय चुरशीच्या लढतीत झोराष्ट्रीयनवर दोन धावांनी मात केली व या साखळी स्पर्धेतील लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली.
नाशिक तर्फे फलंदाजीत रविंद्र मत्च्या व मुस्तानसिर कांचवाला तर गोलंदाजीत प्रथमेश कसबे व प्रतीक तिवारी यांनी प्रभावी कामगिरी केली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने ४९.२ षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. त्यात रविंद्र मत्च्याने सर्वाधिक ५१ व मुस्तानसिर कांचवालाने ४१ धावा केल्या . उत्तरदाखल झोराष्ट्रीयनने शेवटच्या षटकापर्यंत जोरदार लढत देत ५० षटकांत ९ बाद २३८ धावा केल्या. झोराष्ट्रीयननच्या सलामीवीर सागर पवारने सर्वाधिक ७१ धावा केल्या. नाशिकचे फिरकी गोलंदाज प्रथमेश कसबेने ४ , प्रतीक तिवारीने ३ व आयुष ठक्करने १ तर आकाश बोरसेने शेवटच्या षटकात १ गडी बाद केला व अटीतटीच्या लढतीत नाशिकला २ धावांनी विजय मिळवून दिला.
इतर दोन सामन्यात महात्मा नगर क्रिकेट मैदानावर जळगावने पारसी जिमखानावर १० गडी राखून मात करत मोठा विजय मिळवला तर म्हसरूळ येथील एम सी सी क्रिकेट मैदानावर रत्नागिरीने रायगडवर १६९ धावांनी विजय मिळवला.