इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांनी तीन सभा घेतल्य; मात्र बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत पवार यांची प्रकृती बरीच बिघडली. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
पण, आता त्यांनी पुन्हा प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री…. अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब!
अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं…. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ १ दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय…
हाती विचारांचं हत्यार घेऊन…म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं….मिशा काढण्यासाठी