नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकवर वरीष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांसाठी नाशिक जिल्हा ॲथलेटीक्स स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये धावण्याचे १०० मीटर पासून ते १०,००० मीटर धावणे, उडी प्रकारातील लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी असे सर्व प्रकार आणि थ्रो या प्रकारातील भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक हातोडा फेक असे सर्व प्रकार यांचा समावेश होता. आज दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या विविध स्पर्धामध्ये खेळाडूंनी आपल्या सुंदर खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपद मिळविले. पुरुष गटात शुभम भंडारे, वेदांत सनासे , तुषार सूर्यवंशी, रणजीत पाटील, अजीझ मुलानी, सतीश देशमुख यांनी तर महिलांमध्ये वैष्णवी पानसरे,साक्षी कसबे, वेदिका चव्हाणके, श्रावणी सांगळे, अमीरा शहा यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विविध क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपल चेस या अवघड प्रकारात शुभम भंडारे याने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सर्वात कमी ०९:२०:५९ मिनिटामध्ये हे आंतर पूर्ण करून विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या २०० मिटर प्रकारात वेदांत सनासेने २३:०९ सेकंदात रेस पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला तर पियुष सोनारने दुसरा आणि हर्षल बच्छावने तिसरा क्रमांक मिळविला. पूरूषांच्या ८०० मिटर धावणे प्रकारात तुषार सूर्यवंशीने ही धाव सर्वात कमी वेळेत म्हणजे ०१:५८:०० मिनिटामध्ये पूर्ण करून विजेतेपद मिळविले तर हर्षित बच्छाव ने दुसरा आणि खंडेराव जाधवने तिसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या १०,००० मिटर धावणे प्रकारात रंजीत पाटीलने सर्वांना मागे टाकत हे धाव ३०:२९:७४ मिनिटांमध्ये पूर्ण करून विजेतेपद मिळविले या प्रकारात कमलाकर देशमुखने दुसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात अजीझ मुलानीने प्रथम, अरबाझ शेखने दुसरा आणि शुभम ढगे याने तिसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या थाळी फेक प्रकारात सतीश देशमुखने सर्वात जास्त ४६:८९ मीटर दूर थाळी फेकून प्रथम क्रमांक मिळविला, पियुष लहामगेने दुसरा आणि विनायक शिंदेने तिसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ४ x ४०० मीटर रिलेमध्ये तुषार सूर्यवंशी, हर्षित बच्छाव, खंडेराव जाधव अर्णव खैरनार या चौकडीने सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविला तर ४ x १०० मीटर रिले य प्रकारात पियुष सोनार, सुमित गायकवाड, हर्षल बच्छाव,आणि वेदांत सनासे यांनी प्रथम क्रमांक मिळविला .
महिलांमध्ये २०० मीटर धावणे प्रकारात वैष्णवी पानसरेने ही रेस २४:५९ सेकंदामध्ये पूर्ण करून विजेतेपद पटकावले, महिलांच्या ४०० मिटर हर्डल्स प्रकारात श्रावणी सांगळेने केवळ ०१:०९ मिनिटामध्ये रेस पूर्ण करून विजेतेपद मिळविले. महिलांच्या १०,००० मिटर धावणे प्रकारात साक्षी कसबे हीने हे रेस सर्वात आधी ४६:२९:९४ मिनिटांमध्ये पूर्ण करून विजेतेपद पटकावले. महिलांच्या हातोडा फेक प्रकारात वेदिका चव्हाणके हीने ३८:३३ मीटर हातोडा फेकून पहिला क्रमांक मिळविला. महिलांच्या ४०० मिटर धावणे प्रकारात श्रावणी सांगळे हीने केवळ ०१:००:१७ सेकंददामध्ये हे आंतर पार करून दुसरे सुवर्णपदक आपल्या नावे केले. महिलांच्या थाळी फेक प्रकारात अमीरा शहाने ४३:२५ मिटर थाळी भिरकावून पहिला क्रमांक मिळविला. तर स्नेहा अंधारेने दुसरा आणि प्रांजल वाघने तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विविध प्रकारात पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडुंना मेडल्स आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आणि ऍथलेटिकस फेडेरेशन ऑफ इंडियाच्या नियमावलीतील ठरवून दिलेल्या निकषानुसार खेळाडूंची नाशिक जिल्हा संघामध्ये निवड करण्यात आली आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक १ ते ४ जून, २०२४ दरम्यान नागपूर येथे आयोजित ७२ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहितीआयोजकांनी दिली. या स्पर्धाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, संचालक विजय पवार, सहसचिव वैजनाथ काळे, प्रशिक्षक संदीप फोगट, प्रसाद राजोळे, श्रुती पांडे, शारदा वायचळे, व्ही. दि. के फौंडेशनची टीम आणि जिल्हा संघटनेचे पंच प्रशिक्षक आणि सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
अंतिम निकाल :- पुरुष –
३००० मिटर स्टीपलचेस – १) शुभम भंडारे – (०९:२०:६९ मिनिट) २)किर्तीकुमार करीहरपाल – (०९:३७:८९ मिनिट)
२०० मीटर धावणे – १)वेदांत सन्सने (२३:०९ सेकंद) २)पियुष सोनार (२३:१७ सेकंद) ३) हर्षल बच्छाव (२३:४७ सेकंद)
८०० मीटर धावणे – १) तुषार सूर्यवंशी (०१:५८:०० मिनिटे) २) हर्षित बच्चव (०१:५९:०० मिनिटे) ३) खंडेराव जाधव (०२:०५:३० मिनिटे)
१०,००० मिटर धावणे – १)रंजीत पाटील – (३०:२९:७४ मिनिटे) २)कमलाकर देशमुख– (३४:३४:३१ मिनिटे)
उंच उडी – १)अजीझ मुलानी – (व . मीटर) २)आरबाझ शेख –(०१.९० मीटर) ३)शुभम ढगे (०१. मीटर)
थाळी फेक – १)सतीश देशमुख – (४६:८९ मीटर) २)पियुष लहामगे – (४२:८२ मीटर) ३)विनायक शिंदे (३४:७७ मीटर)
४ x ४०० मीटर रिले – १) तुषार सूर्यवंशी, हर्षित बच्छाव, खंडेराव जाधव अर्णव खैरनार – प्रथम क्रमांक.
४ x १०० मीटर रिले – १) पियुष सोनार, सुमित गायकवाड, हर्षल बच्छाव, वेदांत सनान्से – प्रथम क्रमांक.
महिला –
२०० मीटर धावणे – १)वैष्णवी पानसरे (२४:५९ सेकंद)
४०० मिटर हर्डल्स – १)श्रावणी सांगळे (०१:०९ मिनिट)
१०,००० मिटर धावणे – १)साक्षी कसबे – (४६:२९:९४ मिनिटे)
हातोडा फेक – १) वेदिका चव्हाणके – (३८:३३ मीटर)
४०० मिटर धावणे – १) श्रावणी सांगळे – (०१:००:१७ सेकंद)
थाळी फेक – १) अमीरा शहा (४३:२५ मिटर), २) स्नेहा अंधारे (३६:२० मीटर, ३) प्रांजल वाघ (३२:३५ मीटर)