नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या पाच जणांनी रविवारी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. याबाबत पंचवटी, इंदिरानगर, मुंबईनाका,गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना पखालरोड भागात घडली. गीता विनायक कांबळे (७० रा.अलिव्हीया अपा.लेन नं. रॉयल कॉळनी,जोहरी पार्क) या वृध्देने रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत. तर दुस-या घटनेत राम नरेश बरविला भैसट (३१ रा.श्री गुरूजी हॉस्पिटल मागे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर) या परप्रांतीयाने आपल्या राहत्या ठिकाणा जवळील एका झाडाला केबलच्या वायरने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत हरिश धोद यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
तिस-या घटनेत पुनम गणेश सोनवणे (२४ रा.अन्नपुर्णा रो हाऊस कारगिल चौक, दत्तनगर) या महिलेने गेल्या १७ मार्च रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात टॉयलेट क्लिनरचे सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच तिला तात्काळ लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईनाका भागातील अॅपेक्स हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. रोशन कुमावत यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरराव करीत आहेत.
चोथ्या घटनेत सिध्देश्वर देविदास चव्हाण (४३ रा.न्हावी गल्ली,काळाराम मंदिर पूर्व दरवाजा) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच हेमंत पवार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाडेकर करीत आहेत.
पाचवी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. अमित एकनाथ बोरसे (२० रा.सुमन अपा.गजानन महाराज मंदिराजवळ,चांगल चुंगल हॉटेल समोर पाथर्डी फाटा) या युवकाने रविवारी दुपारच्या आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत सोमनाथ बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.