इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे व भाजपचे अनिल जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर ठाकरे गटाचे विजय करंजकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतल्यामुळे त्यांनी आज उमेदवारी मागे घेतली. पण, शांतीगिरी महाराज यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे आता त्याचा कोणाला फटका बसतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात मित्र पक्षांच्या या दोन्ही उमेदवारांमुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी राज्यपातळीवरुनच जोरदार हालाचाली सुरु झाल्या होत्या. अरिंगळे यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केला तर अनिल पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. त्यामुळे या उमेदवारांनी माघार घेतली. माघारीसाठी अवघे १ मिनिट बाकी असतांना अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यामुळे सर्वांची दमछाक झाली.
दुसरीकडे दिंडोरी मतदार संघातही भाजपचे बंडखोर उमेदवार व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी माघार घेतली.