नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोडवरील बारदानफाटा भागात बंद फ्लॅटच्या दुरूस्तीसाठी आलेल्या कारागिर व त्याच्या कामगाराने सुमारे ५० हजाराचे लोखंडी साहित्य चोरून नेल्याचा प्रकार घडला. त्यात लोखंडी पत्रे सिमेंट शिट, लोखंडी पाईप आणि इन्व्हेटर बॅटरी बॅकअप आदी साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल विश्वकर्मा व इरफान खान (रा.शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत चंद्रकांत नारायण लासुरे (४८ रा.युनियन पार्क,सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. लासुरे यांनी बारदान फाटा भागातील कोरडे नगर येथे नुकतीच सदनिका खरेदी केली आहे. या फ्लॅटच्या दुरूस्तीचे काम संशयित वेल्डर विश्वकर्मा यांना देण्यात आले होते.
३० एप्रिल रोजी काम आटोपून संशयितांनी पार्किंगमध्ये आणि टेरेस मध्ये ठेवलेले लासुरे यांच्या मालकिचे लोखंडी पत्रे,सिमेंट शिट, लोखंडी पाईप आणि इन्व्हेटर बॅटरी बॅकअप असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.