नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंचवटीतील नायरा पेट्रोल पंप भागात व्याजाच्या रकमेसाठी दोघा सावकारांनी चिकन व्यावसायीकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेने शहरातील बेकायदा सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत रामदास पाटील व किरण पाटील (रा.त्रिकोणी बंगल्याजवळ,साईनगर) असे चिकन व्यावसायीकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत शादाब जलील सौदागर (रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. सौदागर यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी व्यावसायीकवृध्दीसाठी संशयितांशी आर्थिक व्यवहार केला होता. मात्र वेळेवर पैसे देता आले नाही त्यामुळे ही हाणामारी झाली. सौदागर ३० एप्रिल रोजी कामानिमित्त शहरात आले असता ही घटना घडली.
पंचवटीतील नायरा पेट्रोल पंप परिसरात दोघा संशयितांनी गाठून तू माझे व्याजाचे पैसे का दिले नाहीत या कारणातून वाद घालत सौदागर याना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी संतप्त किरण पाटील याने पाठीत लोखंडी रॉड मारल्याने सौदागर जखमी झाले असून अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.