इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः ‘नीट पेपर लीक’च्या दाव्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर निशाणा साधला. तरुणांच्या भवितव्याशी खेळले जात आहे. पंतप्रधान मोदी या संपूर्ण प्रकरणावर गप्प का? असा सवाल त्यांनी केला.
प्रियंका यांनी ‘सोशल मीडिया एक्स’ वर लिहिले, की पुन्हा एकदा ‘नीट’पेपर लीक झाल्याची बातमी येत आहे. देशातील २४ लाख तरुणांच्या भवितव्याशी पुन्हा एकदा खेळ झाला. गेल्या दहा वर्षांपासून करोडो होतकरू तरुणांसोबत सुरू असलेला हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशाचे पंतप्रधान यावर काही बोलतील का? तरुणांचे मनोरंजन करण्यासाठी संसदेत पेपरफुटीविरोधातील कायदा मंजूर करण्यात आला. तो कायदा कुठे आहे? त्याची अंमलबजावणी का होत नाही? असे सवाल त्यांनी केले. बेरोजगारी आणि नोकऱ्यांमधील भ्रष्टाचार हे या निवडणुकीतील सर्वात मोठे मुद्दे आहेत. आमचा न्याय पत्र संकल्प करतो, की पेपर लीक थांबेल. कॅलेंडरनुसार भरती होईल. रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबेल आणि आम्ही हे करू.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात घेण्यात आली. या वेळी सवाई माधोपूर येथील एका केंद्रातील काही उमेदवारांना जबरदस्तीने प्रश्नपत्रिका घेऊन बाहेर काढण्यात आले. अनेक उमेदवारांनी हिंदी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाचा पेपर दिल्याच्या तक्रारी केल्या; मात्र ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) पेपरफुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.