नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यात दुचाकीस्वारासह चारचाकीतून प्रवास करणा-या एकाचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात गंगापूर रोडवरील सोमेश्वर भागात झाला. मित्रांसमवेत चारचाकी वाहनातून प्रवास करणा-या समिर संजय अहिरे (२१ रा.गंगापूर पोलीस स्टेशन मागे) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. हरी ओम धाबा भागात भरधाव चारचाकी झाडावर आदळल्याने समिर अहिरे गंभीर जखमी झाला होता. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. योगेश पाटील व मांशू मिरलरी या मित्रांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.
दुसरा अपघात जत्रा हॉटेलजवळ झाला. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील दिलीप गंगाधर गांगुर्डे (३५) हे गेल्या २८ एप्रिल रोजी रात्री आडगाव कडून जत्रा हॉटेलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर सर्व्हीसरोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. डी मार्ट भागात भरधाव अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने गांगुर्डे गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी (दि.५) उपचार सुरू असतांना डॉ. प्रतिका पडोळे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.