इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी आपाल उमेदवार अर्ज कायम ठेवला आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी ते उमेदवारी ठेवतात की माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, त्यांनी माघार न घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणले आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. पण, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. उत्तर महाराष्ट्रात जय बाबाजी भक्त परिवाराजी संख्या मोठी असल्यामुळे महायुतीला चांगलीच धडकी भरली आहे.
शांतीगिरी महाराज यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज भरतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडूनही एक अर्ज भरला. पण, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. आज माघारीचा दिवस असतांना त्यांनी माघार घेतली नाही.
शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील चार ते पाच मतदार संघात त्याचा फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये सुध्दा महायुतीच्या उमेदवाराला अडचण होईल. त्यामुळे महायुतीने सर्व प्रयत्न केले. पण, शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.