नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील ४ कोटी ९२ लाखांचे दागिने दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही चोरी बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जुना गंगापूर नाका येथे असलेल्या या कपंनीत ही चोरी झाली. याप्रकरणी जयेश कृष्णदास गुजराथी (रा. खंडेराव नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनंतर सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत मुठेकर यांनी शाखा उघडली. त्यानंतर गोल्डन लोनचे किरण जाधव हे दिवसभर शाखेत काम करीत होते. सायंकाळी पाऊणे सहाच्या सुमारास ग्राहक त्यांचे सोन्याचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी ग्राहक व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर हे दोघे त्यांच्याकडील चावी घेऊन लॉकर उघडण्यासाठी गेले. त्यावेळेस चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या धक्कादायक घटनेनंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही तपासले असता, शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान, दोघा संशयितांनी बिझनेस मॅनेजरच्या कार्यालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केल्याचे दिसले. २५ ते ३० वयोगटातील दोघे संशयित असून, एकाच्या डोक्यात पांढऱ्या रंगांची हुडी, तर दुसऱ्याच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी आहे. संशयितांनी लॉकर्सच्या चाव्या शाखेतूनच शोधून त्यांनी चार कोटी ९२ लाखांचे दागिने चोरून नेले आहे.