नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात रात्री मुंबईत प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. या पदावर अगोदर अजय बोरस्ते होते. त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रवेश सोहळ्यानंतर करंजकर हे अपक्ष उमेदवारीचा अर्ज आज मागे घेणार आहे. त्यानंतर ते विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार आहे. करंजकर यांनी शनिवारी मेळावा घेऊन लढणार व नडणार असे सांगितले होते. त्यानंतर रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त धडकले व रात्री त्यांनी प्रवेश केला.करंजकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान ओशेटे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर, इगतपुरी, शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे गटात यामुळे नाराज
ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण, एेनवेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव घोषीत झाल्यामुळे ते कमालीचे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरला. पण, रविवारी मोठया घडामोडी झाल्या. त्यात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
दोन तीन गद्दारांनी पक्षाचे वाटोळे केले- करंजकर
गेली १२ वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला होता, मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत माझ्याशी असा दगाफटका केला जाईल याची मला कल्पना नव्हती. उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचे वाटोळे केले असून तेच खरे गद्दार आहेत. उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे करंजकर यांनी यावेळी सांगितले.
करंजकर यांचे पक्षात स्वागत – मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हाच सोडून दिले असून कार्यकर्त्यांला येणाऱ्या अडचणींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. फक्त मी आणि माझे कुटूंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात. त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोकं पक्ष सोडून गेले. ५० आमदार, १३ खासदार आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे करंजकर यांचे पक्षात स्वागत करत असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली.