नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल २ कोटी ५३ लाख ६८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे.
जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत शहरातील औद्योगिक,व्यावसायिक, व्यापारी, बांधकाम क्षेत्रातील विविध संघटनांच्या माध्यमातून ही मोहिम राबविली जात असून १६ व्या दिवशी १९२ हायवा ट्रक माती / सुपीक गाळ काढण्यात आला. जवळपास २३०४ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला व त्याद्वारे २३ लाख ०४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.
धरणातून काढलेला गाळ आजुबाजुच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून, यामुळे जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या मोहिमेसाठी शहरातील सर्वच प्रमुख संस्था, संघटना आणि फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. ही मोहिम जिल्ह्यातील अन्य धरण, तलाव, गांव तळे येथे देखील राबविली जाणार आहे. जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात धरणांची पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी 744 744 37 33 व 744 744 37 66 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जलसमृद्ध नाशिक अभियान २०२४ च्या वतीने करण्यात आले आहे