नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय २३ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), एक दिवसीय सामन्यात , नाशिकने रत्नागिरी व रायगड पाठोपाठ जळगाववर देखील दणदणीत विजय मिळवला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिकने जळगाववर ६ गडी राखून मात केली. फटकेबाज नाबाद १४७ धावा करणारा नाशिकचा डावखुरा सलामीवीर मोहम्मद ट्रंकवाला हा विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. गोलंदाजीत स्मित नाथवानी, प्रतीक तिवारी व आयुष ठक्करने प्रभावी कामगिरी केली.
जळगावने प्रथम फलंदाजी करत ४३.४ षटकांत सर्वबाद २०८ धावा केल्या. त्यात साहिल गायकरने सर्वाधिक ६४ धावा केल्या. नाशिकतर्फे स्मित नाथवानीने सर्वाधिक ३ तर प्रतीक तिवारी व आयुष ठक्करने प्रत्येकी २ व प्रथमेश कसबे व गुरमानसिंग रेणुने प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरदाखल नाशिकचा डावखुरा सलामीवीर मोहम्मद ट्रंकवालाने केवळ १०४ चेंडूत १८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १४७ धावांची घणाघाती खेळी करत नाशिकला ३६ व्या षटकात ६ गडी राखून विजयी केले. आयुष ठक्करने २६ धावा करत त्यास साथ दिली.
इतर दोन सामन्यात महात्मा नगर क्रिकेट मैदानावर रत्नागिरीनेहि पारसी जिमखानावर ९ गडी राखून मात करत मोठा विजय मिळवला आणि म्हसरूळ येथील एम सी सी क्रिकेट मैदानावर झोराष्ट्रीयनने रायगडवर ४ गडी राखून विजय मिळवला.