नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात आज रात्री प्रवेश करणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. अजय बोरस्ते यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरुन बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी शनिवारी मेळावा घेऊन लढणार व नडणार असे सांगितले होते. पण, आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त धडकले. आज रात्री ते प्रवेश करणार आहे. त्यानंतर त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होणार आहे. या पदावर अगोदर अजय बोरस्ते होते. पण, त्यांना उपनेतेपद दिल्यामुळे हे पद रिक्त होणार आहे.
करंजकर यांच्या प्रवेश सोहळ्यात शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, राजू आण्णा लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे व नाशिक पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहे. सोमवारी ६ मे ला माघारीची मुदत आहे. त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरु होत्या. बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले विजय करंजकर हे माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबत विविध अंदाज बांधले जात होते. पण, त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता ते माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होणार आहे. विशेष म्हणजे त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीचाही शब्द दिल्याची चर्चा आहे.