नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपची उमेदवारी मागे घेण्यात आली असून मविआच्या उमेदवारास माकपचा सक्रिय पाठिंबा दिल्याची माहिती राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केले आहे.
माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर म्हणाले की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीचे जनतेच्या सर्व थरांतून व्यापक स्वागत झाले. महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते.
वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक प्रक्रियेत पक्षास या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याबद्दल माकप त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. या घडीला माकपने दाखवलेल्या एकजुटीच्या भावनेस आगामी विधानसभा निवडणुकीतदेखील आपले सर्व घटक मजबुती देतील अशी ग्वाही मविआने दिली आहे. या भ्रातृभावाचे माकप स्वागत करत असल्याचेही डॉ. उदय नारकर म्हणाले.