अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार येत्या १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या अहमदनगर -शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी अशोक कडूस
यांच्या संकल्पनेतून “स्टाफ लोकशाहीचा ” या नाविन्यपूर्ण ग्रुप फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे विमोचन भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार (स्वीप) आराधना शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले.
विविध संस्था, आस्थापने, कार्यालये, दुकाने, शाळा-महाविद्यालये यातील कर्मचारी वर्गाने आपल्या प्रमुखासह मतदानाचे बोट समोर दाखवून आम्ही सर्वजण मतदान करणार हा संदेश देत ग्रुप फोटो काढून स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत. यासाठी आचारसंहितेचे पालन आवश्यक आहे. सर्वांचा एकाच गणवेशात अथवा एकाच रंगांमध्ये फोटो काढून नाविन्य दर्शवता येईल.तसेच राष्ट्रीय मतदार ओळखपत्र-वोटर कार्ड हातात घेऊन देखील फोटो काढता येतील. पुरुषवर्ग व स्त्री वर्ग मिळून एकत्र फोटो तसेच पुरुष वर्ग व स्त्री वर्ग वेगवेगळे ग्रुपचे फोटो देखील पाठवता येतील.उत्कृष्ट संकल्पनांना भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
“या उपक्रमाच्या माध्यमातून एखाद्या कार्यालयातील सर्व स्टाफच्या एकीचे दर्शन होऊन मतदानाबरोबरच सर्व सुख-दुःख तसेच विविध घटनांमध्ये आपण एकत्र राहू अशी देखील सुरुवात होणार आहे. यामुळे देशभावना वाढीस लागून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होणार आहे ” असे प्रतिपादन आराधना शर्मा यांनी केले.प्रत्येक सहभागी स्पर्धक संघास सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असून सर्व संघांनी आपले ग्रुप फोटो कार्यालयाच्या नावासह देशातल्या पहिल्या व्हाट्सअप स्वीप केअर असलेल्या ९००२ १० ९००३ या व्हाट्सअप क्रमांकावर १२ मे २०२४ पर्यंत पाठवावेत.
जास्तीत जास्त सरकारी , निमसरकारी , खाजगी , व्यावसायिक , सेवा कार्यालयातील अधिकारी,कामगार ,जिल्हाभरातील वेगवेगळ्या दुकानांतील कर्मचारी वर्ग यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच मतदान देखील करावे असे आवाहन राहुल पाटील(उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार),डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.