मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २००४ मध्ये भाजपने ‘शायनिंग इंडिया’ मोहिमेतंर्गत लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला होता. या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप विजय होईल, अशी खात्री अनेकांना होती; मात्र तेव्हा माझे मत वेगळे होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून माझे मत खरे ठरले होते. सध्या भाजपकडून ‘४०० पार’चा कितीही प्रचार केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालात वेगळे चित्र दिसेल, असा दावा शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले, की सध्या लोक गप्प आहेत. कारण लोकांमध्ये मोदी यांची दहशत आहे. त्यामुळे लोक सध्या लोक कोणतीही प्रतिक्रिया देत नसले, तरी मतदानाला जातील, तेव्हा प्रतिक्रिया देतील आणि ही प्रतिक्रिया मोदी यांच्याविरोधात असेल. मोदी यांना जे साध्य करायचे आहे, ते साध्य करण्याची स्थिती सध्या नाही. लोकांचा पाठिंबा घसरला आहे. सत्ता आपल्या हातातून जाईल, अशी आहे. अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा टोकाची भूमिका घेतली जाते. त्या वेळी संबंधित व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही. मोदी यांचे तसेच झाले आहे. नियंत्रण सुटल्यामुळे पंतप्रधानपदाची गरिमा ठेवण्याचे स्मरणही त्यांना राहिले नाही. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात अशी टीकाही पवार यांनी केली.