नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात शनिवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आता सोमवारी ६ मे ला माघारीची मुदत आहे. त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरु आहे. बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले विजय करंजकर हे माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबत विविध अंदाज बांधले जात होते. पण, त्यांनी शनिवारीच हितचिंतकांचा मेळावा घेऊन मी लढणार व नडणार अशी भूमिका घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहे.
तेरा वर्षापासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असतांना अनेकांची कामे केली. त्यामुळे आता पुढील काळात आपण सर्व मला साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून उमेदवारीवर ठाम असल्याची भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहे. हितचिंतकाच्या मेळाव्यात त्यांनी राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे. एक जण एंन्ट्री करत तर सात जण पाय ओढतात. माझ्याकडे देखील पाच जण मागे ओढायला होते. असे सांगत त्यांनी ठाकरे सेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली.
विजय कंरजकर यांची उमेदवारी ठाकरे गटाला जशी मारक ठरणार आहे. तशीच ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सुध्दा अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे करंजकर आज ठाम असले तरी आज दिवसभर काय घडामोडी घडतात. व उद्या माघारीनंतर काय चित्र असले यावर या निवडणुकीचे अंदाज स्पष्टपणे बांधता येणार आहे.