नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात शनिवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आता सोमवारी ६ मे ला माघारीची मुदत आहे. त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरु आहे. बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे व ठाकरे गट या दोघांच्या उमेदवाराविरुध्द बंडखोर उभे आहे तर दिंडोरीत भाजपासमोरही आव्हान आहे.
लोकसभा निवडणुकीत मतांची विभागणी होवू नये व चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी या बंडखोरांना थोपवण्यासाठी सर्व प्रकाराचे प्रयत्न केले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटात विजय करंजकर यांनी बंडखोरी करुन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतली नाही तर त्याचा फटका राजाभाऊ वाजे यांना बसणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या समोर भाजपचे अनिल जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. जाधव यांनी माघार घेतली नाही तर त्याचाही फटका बसणार आहे. या दोघां व्यतिरिक्त काही अपक्ष व जे मत विभागणी करु शकतात अशा उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहे.
दिंडोरी मतदार संघात तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला माकपच्या उमेदवारांचे आव्हान आहे. पण, त्यात काही बदल होईल असे वाटत नाही.