इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती लोकसभा मतदार संघात ७ मेला मतदान आहे. पण, त्यापूर्वीच दोन सख्ख्या बंधूनी एकमेकांना आव्हान दिल्यामुळे या मतदार संघात ही चर्चा चांगलीच रंगली आहे. बारामती मध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर टीका करतांना सांगितले की, सध्या सुप्रिया सुळे सोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण ४ जूननंतर दिसणार नाही. जर एक जण जरी दिसला तर माझ्या मिशा काढेन असे सांगितले होते. या टीकेला त्यांचे बंधु श्रीनिवास पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ४ जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांना भाजपच्या पहाटेच्या शपथविधीबाबतही सविस्तर माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करा असे शरद पवार यांनी सांगितले, याचा अर्थ निर्णय घ्या किंवा शपथ घ्या असा होत नाही, असा घरचा आहेर अजित पवार यांना त्यांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या शपथविधीबाबत अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना श्रीनिवास पवार म्हणाले, की २०१९ मध्ये भाजपशी चर्चा करण्यास अजित पवार यांना सांगितले होते, याचा अर्थ त्यांना निर्णय घेण्यास सांगितले होते असा होत नाही. चर्चा करून लगेच शपथविधी घ्या, असेही त्यांना सांगितलेले नव्हते. प्रत्येक पक्षात अशी चर्चा करण्याचे अधिकार ठरविक नेत्यांना दिले जातात. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा अधिकार अजित पवार यांना दिला होता. अशी कोणतीही चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णयाचे अधिकार पक्षाध्यक्षांना असतात. त्या वेळचा निर्णय शरद पवार यांचा नव्हता. तो निर्णय शरद पवार यांचा असता, तर त्यांनी ते सरकार पडू दिले नसते. त्यांनी म्हटले असते, ठीक आहे. झाले ते झाले. आता पुढे जाऊ या.
श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या सहा महिन्यांतील बदललेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. अजित पवार यांची सहा महिन्यांपूर्वीची वक्तव्य पाहा. त्या वेळी ते सुप्रिया सुळे यांचे कौतुक करत होते. त्यांच्यातला झालेला बदल लोकांना कळत आहे. लोक सूज्ञ आहेत. ते योग्य निर्णय घेतील; परंतु बारामतीकर शरद पवार यांच्या पाठिशी आहेत. गेली ६० वर्षे ते शरद पवार यांच्यासोबत आहेत, हे दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांचा झाला आहे. या पक्षातील कोणत्याच नेत्यावर आरोप नाही. ज्यांच्यावर आरोप होते, ते तिकडे गेले. निवडणुकीत आम्ही प्रथमच प्रचार करीत नाही. यापूर्वी प्रचार करत होतोच. आमचे गावात आणि मतदार संघात सामाजिक संबंध आहेत. अनेक मित्र आहेत. त्यांच्यापर्यंत आम्ही जात असतो, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.