इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक सर्वेक्षणे पुढे येत आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत कर्नाटकप्रमाणे धोका होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेषतः मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला गाफील राहून चालणार नाही, असे सांगितले जात आहे. तर तेलंगणामध्ये भाजपने स्वप्न न बघितलेलेच बरे, असे हा सर्वे स्पष्टपणे सांगत आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर ५ डिसेंबरला एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपने अनेक चुकीचे डाव खेळल्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. हाच प्रकार भाजपसोबत मध्यप्रदेशात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण मध्यप्रदेशात काँग्रेसच्या बाजुने जनमत झुकत असल्याचे सर्वेचे म्हणणे आहे. एबीपी न्युज आणि सी व्होटरने केलेला सर्व्हे समोर आला आहे. मध्य प्रदेशात सत्ताबदल होणार असल्याचे चित्र या सर्वेनुसार स्पष्ट होत आहे. काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यास चांगला वाव मिळू शकतो. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. येथे २३० जागा असून काँग्रेसला ११३ ते १२५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपाला १०४ ते ११६ जागा मिळतील. म्हणजे, बहुमतासाठी ११६ चा आकडा काँग्रेस सहज पार करू शकेल, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. काँग्रेसला येथे ४५ तर भाजपला ४४ टक्के मते मिळू शकतात. येथे विधानसभेच्या ९० जागा असून बहुमतासाठी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात कडवी झुंज होणार आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. तेलंगणात देखील भाजपने स्वप्न बघण्यात अर्थ नाही असे चित्र आहे. सध्या सत्ताधारी बीआरएस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तीव्र स्पर्धा होणार आहे. येथे विधानसभेच्या ११९ जागा असून बीआरएसला ४३ ते ५५ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला ४८ ते ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, येथे भाजपाला ५ ते ११ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये आशा
राजस्थान हे एक असे राज्य आहे, जिथे दर पाच वर्षांनी जनमताचा कौल बदलतो. दरवेळी नवीन सरकार येत असते. त्यामुळे यंदा भाजपच्या बाजुने कल राहू शकतो असे हा सर्वे म्हणतो. राजस्थानमध्ये भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. २०० जागांपैकी १२७ ते १३७ जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला ५९ ते ६९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मिझोराममध्ये नो चान्स
मिझोराम राज्यात स्थानिक मिझो नॅशनल फ्रंट हा स्थानिक पक्षा सर्वाधिक मजबूत पक्ष आहे. त्यामुळे त्यांचेच सरकार पुन्हा येणार, हे निश्चित आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला काही जागा मिळू शकतात. पण भाजपला तिथे काहीही संधी नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
5 state elections announced…whose government will come? See what this survey says…