नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड कॅम्प येथे १७ ते १९ मे या कालावधीत तायक्वांदो क्रीडा प्रकारातील साधारण आणि सिद्ध खेळाडूंची स्पोर्ट्स कॅडेट म्हणून प्रशिक्षणास निवड करण्यासाठी प्रेरणा रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्प हा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि भारतीय लष्कर यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या रॅलीत क्रीडा शाखेतील निवड चाचण्या, शारीरिक आणि तांत्रिक कौशल्य चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक आणि अधिकारी मंडळाच्या अंतर्गत घेतली जाईल. संरक्षण मंत्रालय (लष्कर), भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एकात्मिक मुख्यालयाने मंजूर करेपर्यंत ही निवड तात्पुरती राहील. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निवडलेल्या कॅडेट्सना प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.
खेळाडूंचे वय १७ मे २०२४ रोजी ८ ते १४ वर्षे दरम्यान (जन्म १७ मे २००८ ते १७ मे २०१४ दरम्यान) असावे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्यांच्या अपवादात्मक उल्लेखनीय प्रकरणांमध्ये कमाल वयोमर्यादा १६ वर्षांपर्यंत राहिल. वयानुसार उंची व वजनाचे मापदंड राहतील. शारीरिक मापदंडामध्ये कोणतीही कमतरता सामान्यतः स्वीकारली जाणार नाही. तथापि, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे किंवा पदके असलेल्या अपवादात्मक प्रतिभावान मुलांच्या बाबतीत उंची आणि वजनाचे निकष शिथिल केले जातील. वैद्यकीय तपासणी वैद्यकीय स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरच्या तज्ज्ञ अधिकाऱ्याकडून केली जाईल.
खेळाडूंचा जन्माचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळेतून किंवा सरपंच यांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्राच्या मूळ प्रती, जिल्ह्यातील क्रीडा सहभाग, पदक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि ज्या पातळीवर खेळ खेळले आहेत त्या पातळीवरील मूळ प्रमाणपत्रे उमेदवाराला सादर करावी लागतील. त्याचबरोबर सहा रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व अर्जासोबत साक्षांकित केलेली प्रमाणपत्राची एक प्रत जमा करावी लागेल.
निवडलेल्या उमेदवारांना बॉईज स्पोर्ट्स कंपनीकडून बोर्डिंग व लॉजिंग, सहावी ते दहावीपर्यंतची इंग्रजी माध्यमाची पुस्तके, स्टेशनरी, वर्षातून एकदा पूर्ण स्पोर्ट किट, पूर्ण भारतात स्पर्धा प्रदर्शनासाठीचा खर्च आदी सुविधा मोफत पुरविण्यात येतील. त्याचबरोबर वैद्यकीय आणि अपघात विमा संरक्षण दिले जाईल. उमेदवार १० वी उत्तीर्ण झाल्यावर आणि १७ वर्षे वय झाल्यावर, सर्व अटी आणि शर्तीनुसार सैन्यात नावनोंदणीसाठी लागू असलेल्या अंतिम निवड प्रक्रियेत उमेदवाराचे नाव दिले जाईल. कोणत्याही कारणास्तव सैन्यात नावनोंदणी होऊ न शकल्यास अशा मुलांचे पालक मुलांवर शासनाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास जवाबदार असतील. निवडलेल्या मुलांच्या पालकांनी यासाठी बिगर न्यायालयीन मुद्रांक कागदावर हमीपत्र देणे आवश्यक आहे.
प्रेरणा रॅलीच्या कालावधीत जेवण आणि राहण्याचा खर्च उमेदवारांनी स्वत: करणे आवश्यक आहे. चाळणीद्वारे निवड कालावधीत, उमेदवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी नाशिक येथे त्यांच्या राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था स्वतः करावी. रॅलीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसोवत कोणत्याही महिलांना परवानगी दिली जाणार नाही.
नोंदणीसाठी उमेदवारांनी आर्टीलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प येथे १७ मे रोजी सकाळी ७ नंतर उपस्थित रहावे. संपूर्ण निवड प्रक्रिया तीन दिवसांत पार पाडण्याची शक्यता आहे. निवड प्रगतीशील टप्प्यात होईल. जे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर योग्य नाहीत त्यांना निवड चाचणीच्या पुढील टप्यात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही. निवड झालेल्या मुलांना निवड चाचणीच्या तारखेपासून ३ ते ६ महिन्यांच्या आत बीएससी, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड कॅम्पमध्ये रूजू होण्यासाठी एसआयए कडून योग्य मान्यता मिळाल्यानंतर निश्चित तारीख नंतर कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी ऑफिसर कमांडिंग आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प पिन – ९०८८०० द्वारा ५६ अेपीओ येथे किंवा तायक्वांदो प्रशिक्षक भ्रमणध्वनी क्रमाक ७००५०५३८८२ वर संपर्क साधावा. या रॅलीकरिताचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध आहेत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि). यांनी कळविले आहे.