इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन तसेच संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी मार्गावरील आयटीआय परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी लॉंगमार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
यावेली त्यांनी महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे आगामी निवडणुका आम्ही लढविणार आहोत. त्यात लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभेच्या १५ जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत, असे जयदीप कवाडे असे यांनी सांगितले. यासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचेही जयदीप कवाडे यांनी सांगितले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पीपल्स रिपब्लिकन पक्षाद्वारे भीमसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येते. यंदा 43 वे राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील आलेल्या कार्यकर्त्यांना प्रथमच अन्य राजकीय पक्षाच्या नेत्याला निमंत्रीत करण्यात आले आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती आहे. त्यामुळे त्यांना या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलविण्यात आल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी दिली. यंदा संविधान सन्मान रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून देशभरातील लाखो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत.
गायरान जमिनीचे मालकी पट्टे , झोपडपटट्यांचे पूनर्वसन, भूमीहिन शेतमजुरांना जमीनीचे वाटप , ‘बार्टी’ चे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे , शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरणास विरोध , सरकारी क्षेत्रातील सर्व स्तरावरील कंत्राटी नोकर भरतीस विरोध, 33% टक्के महिलांचे आरक्षण, अॅट्रॉसिटी कायदयाची कठोर अंमलबजावणी, मागासवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पक्षाची राजकिय भूमिका तसेच विविध ठराव याबाबत यावेळी खुल्या अधिवेशनात शिक्कामोर्तब करून पक्षाचा कृती कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल, असेही कवाडे यांनी सांगितले.
चैत्यभूमी ते दीक्षाभूमी ‘मी रिपब्लिकन अभियान’ १४ नोव्हेंबर पासून
रिपब्लिकन आंदोलनाचा निखारा तेजस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने मुंबईतील चैत्यभूमी ते नागपूर दीक्षाभूमी असे ‘मी रिपब्लिकन’ अभियान सुरू करण्यात येणार असून राज्यभरात संविधान जागरण यात्रा देखील आयोजित करण्यात येणार. असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी यापूर्वी केली आहे.