मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळले? त्यांची कौटुंबिक परिस्थिती तर अतिशय चिंताजनक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर मोदी यांना दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते काय महाराष्ट्र सांभाळणार अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवार यांनी प्रत्युत्तर दिले. प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी मोदी यांच्या या विधानावरून त्यांना खोचक टोला लगावला आहे. पवार म्हणाले, की मलाही मोदी यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांनी कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण असे व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मी हे पथ्य न पाळणे योग्य होणार नाही.
मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या; पण त्या अंमलात आलेल्या नाहीत. पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात; पण सरकारला ते करणे झेपेल की नाही? सरकारची तशी स्थिती आहे की नाही? याचा यत्किचिंतही विचार ते करत नाहीत, म्हणून मोदी यांच्याबद्दलची आस्था कमी होत आहे.
दरम्यान, पवार यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूनदेखील निशाणा साधला आहे. मोदी कितीवेळा महाराष्ट्रात येतात? यातून त्यांना आत्मविश्वास नाही हेच दिसते,’ असे पवार म्हणाले.