नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 3 मे 2024 पर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार देण्यात आली होती. त्यानुसार 20 दिंडोरी मतदारसंघात 20 व्यक्तींचे 29 अर्ज प्राप्त झाले होते. 15 उमेदवारांचे अर्ज वैध व पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती लोकसभा निवडणूक 20 दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी छाननी प्रक्रियेवेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे आज सकाळी 11 वाजता 20 दिंडोरी मतदार संघात प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करतेवेळी श्री. पारधे बोलत होते. यावेळी भारत निवडणुक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बिनिता पेगु, उपविभागीय अधिकारी दिंडोरी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह नामनिर्देशन पत्र सादर केलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, तसेच संबंधित अर्जदाराने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त नामनिर्देशन पत्रांसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी 11 वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत वैध व अवैध ठरलेल्या उमेदवारांची माहिती जाहिर केली. तसेच अर्ज माघार प्रक्रिया 6 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात होणार असून त्यांनतर चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचेही दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पारधे यांनी सांगितले.
अशी आहेत नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याची कारणे….
खान गाजी इकबाल अह मुबीन खान : अर्जदार यांचे मतदार यादीतील नाव खान गाजी इकबाल अह मुबीन खान असे असून जातीच्या दाखल्यावर Aetezad Ahd khan असे नमूद केलेले आहे. दोन्ही नावात विसंगती दिसून येते. जातीचा दाखला अर्जदार यांचाच आहे हे अर्जदार संधी देऊनही सिद्ध करू शकले नाही. म्हणुन अर्जदार याचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले आहे.
तसेच खान गाजी ईकबाल अह. अर्जदार यानी MIM तर्फे दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रा सोबत १० सूचक दिलेले नसल्याने त्याचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
काशिनाथ सीताराम वटाणे : यांनी नामनिर्देशनपत्रा MIM पक्षाकडून दाखल केले होते तथापि नामनिर्देशक पत्रासोबत सोबत 10 सूचक नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
संजय कांतीलाल चव्हाण : राखीव लोकसभा मतदारसंघासाठी जातीचा दाखला उमेदवारांनी अर्ज सोबत सादर करणे आवश्यक होते. तथापि, जातीचे प्रमाणपत्र नामनिर्देशन अर्जासोबत जोडलेले नसल्याने नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले.
सुभाष चौधरी : पक्षाने AB फॉर्म मध्ये मुख्य उमेदवाराला प्राधान्य दिलेले आहे. मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र वैध ठरवल्याने पर्यायी उमेदवार म्हणून सुभाष चौधरी यांच्या अर्जासोबत केवळ एकच सुचक असल्याने अर्जदार यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
कुमारी पल्लवी भगरे : पक्षाने AB फॉर्म मध्ये मुख्य उमेदवाराला प्राधान्य दिल्याने मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र वैध ठरवलेले आहे. कुमारी पल्लवी भगरे हे पर्यायी उमेदवार म्हणून पक्षाने AB फॉर्म मध्ये घोषित केलेले आहे तथापि त्यांचे अर्जासोबत केवळ एकच सुचक असल्याने अर्जदार यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.