नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुमावतनगर भागात खंडणीची मागणी करीत प्लंबिगचे काम करणा-या परप्रांतीय भावांना त्रिकुटाने मारहाण करीत ३५ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेत फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्याने चार भाऊ जखमी झाले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन राजेंद्र कुमावत, आदित्य नाईक व प्रथमेश कुंदलवाल (रा.सर्व कुमावतनगर) अशी परप्रांतीय भावंडाना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सनुल्ला हुसेन राजा हुसेन मिया (मुळ रा. बिहार हल्ली कुमावतनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. कुमावतनगर भागात राहणारे सनुल्ला हुसेन मिय्या,आझाद हुसेन मियॉ,अख्तरअली अन्सारी व साबीर हुसेन हे चार परप्रांतीय भावंडे ठेकेदाराच्या माध्यमातून शहरात प्लंबिकचे कामे करतात. बुधवारी (दि.१) रात्री काम आटोपून ते ठेकेदार आतिष विलास भोईर यांच्याकडून मजूरीची ३५ हजार रूपयांची रोकड घेवून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. दोन दुचाकीवरून ते आपल्या घराकडे परतत असतांना कुमावतनगर येथील पाटाच्या बाजूला असलेल्या शंकराच्या मंदिराजवळ त्यांना संशयितांनी अडविले.
यावेळी त्रिकुटाने धाक दडपश्या करीत दारू सेवन करण्यासह जेवणासाठी परप्रांतीय भावंडाकडे पैश्यांची मागणी केली. परप्रांतीय भावंडानी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना लाथाबुक्यांनी आणि फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत चारही भावांची अंगझडती घेत संशयितांनी सनुल्ला मियॉ याच्या खिशातील ३५ हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.