इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बोलतांना कधी जीभ घसरली की त्याचे काय परिणाम होतात हे अजित पवार यांनी अगोदरच अनुभवले आहे. पण, त्यांच्याबाबतीत दुस-याची जीभ घसल्यानंतर त्यांना कसे वाटले असेल याची चर्चा आता सुरु आहे. बारामतीतील एका प्रचार सभेत हा जीभ घसरण्याचा किस्सा घडला.परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाबडा म्हणण्याऐवदी चुकून त्यांनी भामटा असा उल्लेख केला. पण, जानकर यांच्या वेळीच चूक लक्षात आली. त्यांनी ही चूक सुधारली असली, तरी त्यांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जानकर बारामतीमध्ये आले होते. बारामतीमधील सभेत जानकर अजित पवार यांचे कौतुक करत होते. त्यांच्याकडून अनवधानाने अजित पवारांचा भामटा असा उल्लेख झाला. ही चूक लक्षात येताच जानकर यांनी ती सुधारली. मात्र त्यांच्या या विधानाची एकच चर्चा सुरू आहे.
या सभेत जानकर यांनी स्वतःचा भावी मंत्री म्हणून उल्लेख केला. त्यानंतर ते सुनेत्रा पवारांना भरघोस मते देऊन खासदार करा. त्यानंतर आम्ही दिल्लीतून बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणू असे सांगितले. पण, त्यांच्या या सर्व भाषणाची चर्चा होण्यापेक्षा भामटा या शब्दाचीच चर्चा जास्त रंगली.