नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईतील भामट्याने दोन कोटींचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून एका शेतक-यास अडीच लाखाला गंडा घातला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तगादा लावूनही संशयिताकडून दाद मिळत नसल्याने शेतक-याने पोलीसात धाव घेतली आहे.
सुधीर चव्हाण (रा.ब्रीज असो.मुलूंड मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत गणेश भाऊसाहेब माळोदे (रा.आडगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. माळोदे यांची फेब्रुवारी २०२० मध्ये तपोवन कॉर्नर भागातील कृष्णनगर येथे मित्र कुंदन चौधरी याच्या समवेत संशयिताशी भेट झाली होती. मुलूंड येथील ब्रीज असोशिएशन या वित्तीय संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करीत संशयिताने आमची संस्था अल्पदरात कृषी पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. यावेळी माळोदे यांनी अॅग्रो टुरिझमसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितल्याने संशयिताने सातबारासह अन्य कागदपत्रांची पाहणी करून दोन कोटी रूपयांचे कर्ज काढून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी त्याने शेतजमिनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट व प्रॉपर्टी मॉग्रेज डिडी साठी तीन लाख ६५ हजार रूपये लागतील असे सांगितल्याने माळोदे यांनी धनादेशाद्वारे रक्कम सुपूर्द केली. तसेच मित्र चौधरी याच्या घराजवळ संशयिताच्या ताब्यात मुळ कागदपत्रही स्वाधिन केले. यानंतर संशयिताने मोबाईलवर कर्ज मंजूरीचे पत्रही पाठविले. मात्र चार वर्ष उलटूनही कर्जाची रक्कम माळोदे यांच्या पदरात पडली नाही. त्यामुळे त्यांनी तगादा लावला असता संशयिताने एक लाख रूपयांची रक्कम फोन पे द्वारे ऑनलाईन पाठविली. मात्र त्यानंतर संपर्क तोडल्याने माळोदे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.