इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये पारनेर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठींबा देणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
औटी यांच्या या निर्णयानंतर पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी मात्र औटी यांचा आदेश न मानण्याचे जाहीर केले आहे. शिवसैनिकांनी आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. पारनेर तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नगर शहरात झाली. औटी यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर करण्यात आले. पारनेर शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे,युवा सेनाप्रमुख अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारे यांनी लंके यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.