नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात भरदिवसा क्रांतीनगर आणि कामटवाडा भागातील दोन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे १४ लाखाचा ऐवज लंपास केला. या चोरीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना कामटवाडा भागात घडली. सुरेखा अरविंद सोनवणे (रा.योगेश्वर संकुल धन्वंतरी कॉलेज जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटुंबिय बुधवारी (दि.१) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचादीचे दागिणे असा सुमारे १३ लाख १७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.
दुस-या घटनेत क्रांतीनगर येथील ऐनाक्षी राकेश शेवाळे (रा. इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ गणेश चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवाळे कुटुंबिय गुरूवारी (दि.२) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवघरातील चांदीचा मुकूट,दुर्वा जास्वंदीचे फुल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक आहिर करीत आहेत.