इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण गांधी परिवार उपस्थितीत होता. सोनीया गांधी, प्रियंका गांधी, रॅाबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे हे उपस्थितीत होते. आजच काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीतून तिकीट दिले आहे, तर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. राहुल अमेठीतून आणि प्रियांका रायबरेलीमधून लढणार असल्याची चर्चा होती; परंतु प्रियांका निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या.
रायबरेलीची परिस्थिती वेगळी आहे. २०१९ च्या मोदी लाटेतही सोनिया रायबरेलीतून विजयी झाल्या होत्या. रायबरेलीत वीस वेळा निवडणुका झाल्या आहेत. त्यात काँग्रेसने १७ वेळा विजय मिळवला आहे. अमेठीपेक्षा रायबरेली जिंकणे राहुलसाठी सोपे आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.
राहुल केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली, तर त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. राहुल वायनाड किंवा रायबरेलीतील एक जागा सोडू शकतात. अशा परिस्थितीत प्रियांका तेथून निवडणूक लढवू शकतात.