नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वर्दळीच्या द्वारका चौकात भरधाव कारने बसला पाठीमागून धडक दिल्याची घटना महामार्गावरील घडली. कारचालकाने अमली पदार्थाचे सेवनक केलेले असल्यामुळे हा अपघात झाला असून, या घटनेनंतर संतप्त कारचालकाने बसचालकास शिवीगाळ करीत दगड फेकून मारला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकास अटक करण्यात आली आहे.
लक्ष्मण सुधाकर गोवर्धन (२८ रा.सांजेगाव ता.इगतपुरी) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याबाबत एस.टी.महामंडळाचे बसचालक चंद्रकांत भगवान वाघ (रा.मोघन जि.धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ गुरूवारी (दि.२) सायंकाळी धुळे नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. बसमध्ये प्रवासी घेवून शहरात दाखल झाले असता द्वारका भागात हा अपघात झाला. सिग्नल पडलेला असल्याने ते पोलीस चौकीजवळ थांबलेले असतांना पाठीमागून भरधाव आलेली एमएच १५ डीएस ७८८० कार बसवर आदळली.
यावेळी ते बसखाली उतरून पाठीमागे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता अमली पदार्थाचे सेवन केलेल्या संशयिति चालकाने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत झटापट केली. यावेळी संतप्त चालकाने वाघ यांना दगड फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत त्यांच्या चष्म्याचेही नुकसान झाले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.