इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगलेली असतांना काँग्रेसने आज अमेठी व रायबरेलीतून अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांची उमेदवारी काँग्रेसने रायबरेलीतून जाहीर केली. तर अमेठी मधून किशोरीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आज राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
याअगोदर अमेठीतील काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे येथे तोपर्यंत सट्टाबाजार सुरू होता. अमेठीमधून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात राहुल गांधी यांच्यासाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे बोलले जात होते. सोनिया गांधींचे प्रतिनिधी किशोरी लाल शर्मा म्हणाले, फक्त गांधी कुटुंबातील सदस्यच निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी सर्व तयारी केली आहे. गांधी घराण्यातील व्यक्तीनेच अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, दुस-या दिवशी असे म्हणणारे किशोरी लाल शर्माच अमेठीतून उमेदवार झाले.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करणार आहेत. एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या भागातून गांधी कुटुंबीयांपैकी कोणी निवडणूक लढवली नाही, तर वाईट राजकीय संदेश जाईल, असे काँग्रेस नेत्यांचे मत होते. त्यामुळे एका जागेवरुन राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, की पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे येत्या २४ ते ३० तासांत अमेठी आणि रायबरेलीसाठी उमेदवारांची नावे ठरवतील. प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करणार आहेत. एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या भागातून गांधी कुटुंबीयांपैकी कोणी निवडणूक लढवली नाही, तर वाईट राजकीय संदेश जाईल, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. दोन्ही जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित न झाल्याने पक्ष आधीच बॅकफूटवर आहे.
रायबरेलीत भाजपचे दिनेश प्रताप सिंह उमेदवार
भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीतून तिकीट दिले आहे, तर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. राहुल अमेठीतून आणि प्रियांका रायबरेलीमधून लढणार असल्याची चर्चा होती; परंतु प्रियांका निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या. भाजपने दोन महिन्यांपूर्वी इराणी यांना अमेठीतून उमेदवारी दिली होती. स्मृती तिथे सतत प्रचार करत आहेत, तर राहुल यांनी एकदाही अमेठीला भेट दिली नाही. अशा स्थितीत राहुल अमेठीतून जिंकणे अवघड होते.
१७ वेळा विजय
रायबरेलीची परिस्थिती वेगळी आहे. २०१९ च्या मोदी लाटेतही सोनिया रायबरेलीतून विजयी झाल्या होत्या. रायबरेलीत वीस वेळा निवडणुका झाल्या आहेत. त्यात काँग्रेसने १७ वेळा विजय मिळवला आहे. अमेठीपेक्षा रायबरेली जिंकणे राहुलसाठी सोपे आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.
एक जागा सोडावी लागणार
राहुल केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली, तर त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. राहुल वायनाड किंवा रायबरेलीतील एक जागा सोडू शकतात. अशा परिस्थितीत प्रियांका तेथून निवडणूक लढवू शकतात.