नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देऊन अनेकांचे जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टरने मृत्युपश्चात देखील आपले अवयव दान करून ५ रुग्णांना जीवनदान दिले असल्याची घटना नुकतीच नाशिकच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली.
याबाबत माहिती देताना सह्याद्री सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले की, निफाड तालुक्यातील दात्याने येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ४६ वर्षीय डॉ. नितीन मोगल यांना अपघातामुळे मेंदूला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना नाशिकच्या सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मेंदूला गंभीर इजा झाली असल्याने त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना नेहमीच सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या डॉ. नितीन मोगल यांच्या अपघाती निधनाने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु पत्नी रेखा नितीन मोगल व बंधू रमेश यशवंत मोगल यांनी या दुःखाच्या क्षणी देखील स्वर्गीय डॉ. नितीन मोगल यांनी घालून दिलेल्या समाजसेवेच्या आदर्शामुळे मृत्यू पश्चात अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
उत्तर महाराष्ट्रात अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रात अग्रेसर सह्याद्री सुपर स्पेशालिटी टीम यानंतर कामाला लागली. नियमाप्रमाणे शासनाच्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी (ZTCC पुणे) सोबत संपर्क साधण्यात आला. स्व. डॉ. नितीन मोगल यांचे लिव्हर, किडनी, फुफ्फुस हे अवयव दान करता येत असल्याने त्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी झेड. टी. सी. सी (ZTCC पुणे) व स्थानिक पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका बजावली. नाशिकच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रतीक्षा यादीतील एका महिला रुग्णावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे लिव्हर (यकृत)प्रत्यारोपण सुध्दा केले जाते परंतु पुणे येथे क्रिटिकल पेशंट असल्यामुळे लिव्हर हे पुणे येथील हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले.
मृत्यू पक्षात अवयव देणे हा अत्यंत भावनिक निर्णय असतो. परंतु हे अवयव अन्य कोणाच्यातरी शरीरात जिवंत राहून त्या व्यक्तीस जीवदान देऊ शकतील या भावनेतूनच पत्नी रेखा नितीन मोगल व बंधू रमेश यशवंत मोगल यांनी हा निर्णय घेऊन समाजातील जनतेसाठी एक संदेश दिला आहे.
या टीमची महत्त्वाची भूमिका
या अवयवदान प्रक्रियेसाठी ब्रेन डेथ कमिटी तसेच अवयव प्रत्यारोपण समन्वयक आणि रुग्णालयातील स्टाफ यांनी प्रयत्न केले पोलिस विभागातील चे सहायक पोलीस निरीक्षक यतीन पाटील, पो. ना. निकम, पो. ना. गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, हवलदार काकड,हवालदार निंबेकर यांनी ग्रीन कॉरिडॉर साठी अथक परिश्रम घेतले. किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यात नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे कौशल्य आणि समर्पण सुरळीत ऑपरेशन आणि उत्कृष्ट शस्त्रक्रियेनंतरची काळजी सुनिश्चित करते, ज्यामुळे रुग्णाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.
या हेतूने अवयवदान करण्याचा निर्णय
“माझ्या डॉक्टर पतीने अविरत रुग्णसेवा केली. परंतु दुर्दैवाने ते आमच्यातून निघून गेले. अवयवदान या संकल्पनेतून त्यांची अपूर्ण राहिलेली रुग्णसेवा पूर्ण व्हावी या हेतूने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.”
रेखा नितीन मोगल , पत्नी
इतरांनी पण अवयवदान करावे
“माझा लहान भाऊ डॉ. नितीन मोगल यांनी गेली २५ वर्षे दात्याने ता.निफाड येथे रुग्णसेवा केली. त्यांनी कोविड काळात न कंटाळता पूर्ण वेळ रुग्णांना दिला . त्यांची अपूर्ण राहिलेली रुग्णसेवा या अवयवदानाने पूर्ण होईल, तसेच इतरांना जीवदान मिळेल. इतरांनी पण अवयवदान करावे.
रमेश य. मोगल, भाऊ