नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंचवटीतील अमृतधाम आणि आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाखाच्या ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना महालक्ष्मीनगर भागात घडली. सुरेश देवराम धोंगडे (रा.कल्पतरू बंगला,बहिणाबाई बी.एड.कॉलेज मागे) यांनी फियर्द दिली आहे. धोंगडे कुटूबिय मंगळवारी (दि.३०) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख १५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.
दुस-या घटनेत अमृतधाम परिसरातील विजय भास्कर चौधरी (रा.सिध्दीविनायक अॅनॅक्स,वरद कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चौधरी कुटुंबिय सोमवारी (दि.२९) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा १ लाख २३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.