इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी मतदारसंघातील माकपची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत असल्याचा अत्यंत खोडसाळ आणि बदनामीकारक निर्देश काही वृत्तपत्रांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष “जयंत पाटील यांनी गावीत यांचा नामोल्लेख न करता” वरील आरोप केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष साफ फेटाळून लावला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी त्यासाठी एक पत्रक प्रसिध्दीस दिले.
महाराष्ट्रात ४८ पैकी किमान एक जागा महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षास सोडावी, अशी रास्त मागणी पक्षाने केली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात पक्षाचा मजबूत पाया असून पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी, शेतकरी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे हजारोंचा सहभाग असणारे लढे सातत्याने करण्यात आले आहेत. लोकप्रियता गमावलेल्या भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्याची गावीत यांच्यात क्षमता असल्याने महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीवर त्यांचा अग्रहक्क होता. तथापि, दुर्दैवाने महाविकास आघाडीने हा हक्क डावलला.
या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेच्या इच्छेखातर माकपला उमेदवारी जाहीर करण्यावाचून पर्याय राहिला नाही. जे. पी. गावीत यांच्याविषयी निराधार आरोप केल्याने भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यासारखे होईल, याचे तारतम्य असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी बाळगावे, अशी अपेक्षा आहे. हे जर ताबडतोब थांबले नाही, तर माकपला त्याविरुद्ध कायदेशीर इलाज करावा लागेल हा इशारा आम्ही देत आहोत.
जे. पी. गावीत यांची उमेदवारी भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम असल्याने, त्यांच्याविषयी आणि माकपविषयी गैरसमज करणारी असत्य विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन आम्ही संबंधितांना करत आहोत. उलट, भाजपचा पराभव करण्यासाठी अजूनही महाविकास आघाडीने गावीत यांच्या उमेदवारीस पुरस्कृत करावे याचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.