नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोकण पर्यटन विकास संस्था आयोजित कोकण आंबा महोत्सवाचे आज नाशिक येथे पिनॅकल मॉल मध्ये सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक आणि प्रगतिशील शेतकरी विलासराव शिंदे यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन झाले.
नाशिककर दरवर्षी कोकण आंबा महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा आंबा पिक चांगले आले असल्याने मोठ्या संख्येने कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा उत्पादक शेतकरी नाशिक येथे आंबा महोत्सवात सहभागी झालेले आहेत. या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाच स्टॉल दिले जातात. शिवाय शेतकऱ्यांनी आंबा नैसर्गिक पद्धतीनेच पिकवावा अशी अट असते. या ठिकाणी सहभागी होणारे शेतकरी गेली अनेक वर्ष आंबा विक्री साठी सहभागी होत असल्याने स्थानिक ग्राहकांशी त्याचा परिचय झालेला आहे. त्यामुळे शेतकरीही ग्राहकांना नैसर्गिक रित्या गवतात पिकवलेला आंबा पुरवतात.
त्याचबरोबर कोकण पर्यटन विकास संस्थेने आंबा, काजू, फणस, करवंद इत्यादींपासून बनविलेला कोंकण मेवा विक्रीसाठी ठेवलेला आहे. शिवाय कोकण पर्यटन विषयक माहिती देण्यासाठी कोकण पर्यटन मेळा आयोजित केलेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील रमणीय सागर किनारे , वॉटर स्पोर्ट्स, त्याचबरोबर सागरी किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पुरातन मंदिरे अशा विविध पर्यटन स्थळांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कृपया नाशिककरांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा. संस्थेचे संचालक व आंबा महोत्सवाचे आयोजक दत्ता भालेराव आणि आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सदर आंबा उत्सव १२ मे पर्यंत पिनॅकल मॅाल येथे सकाळी ११ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या नाशिक शाखेचे चेअरमन संजय सोनवणे चेंबरच्या एग्रीकल्चर कमिटीचे चेअरमन राजारामजी सांगळे हे उपस्थितीत होते.