इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असूनही उमेदवारी न मिळाल्याने किरण सामंत यांची नाराजी अजूनही कायम आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर हटवले. उदय सामंताऐवजी तिथे किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात येणार असल्याची भूमिका किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत. भाऊ लोकसभेची उमेदवारी मिळवू देऊ शकला नाही, याची खंत त्यांना आहे. त्यामुळे कार्यलयावरील उदय सामंत यांचा फोटो आणि बॅनर हटवण्यात आला आहे. यावर किरण सामंत काहीही भाष्य करायला तयार नाहीत. किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचे पोस्टर ‘सोशल मीडिया’वर झाले आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल झाले असून किरण यांची त्याला संमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी किरण यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटस्ची चर्चा होती. ते महायुतीच्या प्रचारसभेत दिसल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा होती;परंतु आज पुन्हा किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ अशा आशयाचे स्टेटस् ठेवले. किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत, असे समजते. त्यांचे कार्यकर्तेही नाराज आहेत; मात्र आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे सांगितले होते;परंतु आता सामंत यांची नेमकी भूमिका काय हे अद्याप समजले नाही. काही दिवसांपूर्वी किरण महायुतीचा प्रचार करताना दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या; पण आता अचानकपणे किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचा बॅनर हटवण्यात आला आहे. किरण यांच्या कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.