नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात लाख रुपये दिल्यास त्याची तिप्पट रक्कम देण्याचे आमीष दाखवून चलनातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. बागलाण) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून बनावट नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे.
११ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्यांस सात लाखांच्या बदल्यात तेवीस लाखांचे आमीष दाखवून त्याच्याकडील पैसे चोरी करण्यात आले होते. याप्रकरणातील मुख्य संशयित तेजस उर्फ बटी वाघ हा पसार झाला होता. गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक मधुकर कड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ यांनी बागलाण तालुक्यातील डांग सौंदाणे येथे सापळा रचला. संशयित तेजस पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत पोलिसांना पाचशे, दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या खेळण्यातील नोटांचे १५७ बंडल मिळाले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.