इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमीशनर’ या पुस्तकाने सध्या खळबळ उडवून दिली आहे. पहिले अजित पवारांवर पोलीस विभागाच्या जमीनीच्या संदर्भात गंभीर आरोप वाचायला मिळाले. आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल मोठा दावा पुढे आला आहे. पुण्यात दंगल घडविण्याचा प्रयत्न नीलम गोऱ्हे यांनी केला होता, असे या पुस्तकात नमूद आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांचे पुस्तक प्रकाशित होणे आणि त्यातील राजकीय मुद्दे बाहेर येणे हा कमालीचा योगायोग मानला जात आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने भाजप स्पॉन्सर्ड पुस्तक असल्याचा आरोप केला आहे. पण अजित पवार, नीलम गोऱ्हे हे दोन्ही नेते सध्या भाजपसोबत सरकारमध्ये आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलींद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुणे महानगरपालिकेने २३ डिसेंबर २०१० रोजी लाल महलातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविला होता. या विरोधात शिवसेना आणि अन्य काही संघटनांनी २८ डिसेंबरला ‘पुणे बंद’ची हाक दिली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी काही नेतेमंडळींचे दूरध्वनी फोन टॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी पुणे शहराच्या काही भागांमध्ये रास्ता रोको, बस आणि ट्रकची जाळपोळ, दगडफेक करण्याच्या सूचना करीत हिंसाचार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला, असे त्यांच्या संभाषणातून समोर आले होते. दंगल घडवून आणण्यासाठी गोऱ्हे आणि नार्वेकर यांनी कटकारस्थान रचल्याचा ठपका बोरवणकर यांनी ठेवला आहे.
माझेच आदेश ऐकले नाहीत
दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी दिले होते. पण कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या आदेशांकडे दुर्लक्ष केले आणि अतिरिक्त आयुक्तांनी तर तुमची मुंबईत गरज आहे, असे सांगत मला बदली घेण्याचेच सूचविले होते, असे मीरा बोरवणकर पुस्तकात म्हणतात. तरीही गुन्हे दाखल करून घेतले पण न्यायालयाने २०१७ मध्ये गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले, असे सांगत माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश न ऐकण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता, असेही त्यांनी नमूद केले आहे.